LOK SAMACHAR
पर्यटकांसाठी महत्त्वाची सूचना! राज्यातील ‘या’ धोकादायक ठिकाणी १० ऑगस्टपर्यंत प्रवेशबंदी लागू, जाणून घ्या तपशील
राज्यातील सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जंगलातील वाटा अतिशय घसरडे आणि धोकादायक झाले आहेत. त्यातच वाढती गर्दी लक्षात घेऊन वन विभागाने कळसूबाई, रतनगड, अलंग, मदन, कुलंग आणि सांदण दरी येथे पर्यटकांना प्रवेश करण्यास तात्पुरती बंदी घातली आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेतला असून येत्या १० ऑगस्टपर्यंत या ठिकाणी पर्यटकांना जाता येणार नाही.
अलीकडील वर्षांत नाशिक जिल्ह्यातील कळसूबाई-हरिश्चंद्रगड आणि सांदण दरीसारख्या ठिकाणी पुणे व मुंबईमधील पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सामाजिक माध्यमांवरील व्हिडिओ व फोटोमुळे हे पर्यटनस्थळे लोकप्रिय झाल्यामुळे येथे गर्दी वाढली असून, त्याचबरोबर अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी वन विभागाने ही पावले उचलली आहेत.
भंडारदरा वन परिक्षेत्रातील इतर आकर्षक ठिकाणीही पर्यटकसंख्येवर मर्यादा घालण्यात आल्या आहेत. दररोज केवळ ५०० लोकांनाच येथे भेट देण्याची परवानगी मिळेल, तर अभयारण्य क्षेत्रात दुपारी ३ नंतर प्रवेश बंद राहील. सुरक्षिततेसाठी सेल्फी व रील्स काढण्यास बंदी असून, अभयारण्यात छायाचित्रण करण्यासाठी वन विभागाची पूर्वपरवानगी आवश्यक आहे. नियम मोडणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई केली जाईल, असा इशारा नाशिकचे उपवनसंरक्षक गजेंद्र हिरे यांनी दिला.
बंदीचे मुख्य कारण काय?
गेल्या काही आठवड्यांतील सततच्या पावसामुळे रस्ते अतिशय घसरडे झाले आहेत. धुक्यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. त्याचबरोबर कळसूबाई व हरिश्चंद्रगड परिसरात सह्याद्री क्रोटन (क्रोटन गिब्सोनियानस) नावाची अतिशय दुर्मीळ वनस्पती सापडली आहे. जगात केवळ येथेच आढळणारी ही वनस्पती सुरक्षित ठेवण्यासाठी वन विभागाने संवर्धन प्रकल्प सुरू केला आहे. पर्यटकांच्या वाढत्या वावरामुळे वनस्पतीचे संवर्धन कठीण होत असल्यामुळे अभयारण्यातील भटकंती पूर्णपणे थांबवण्याचा निर्णय घेतला गेला आहे, असेही गजेंद्र हिरे यांनी स्पष्ट केले.