धावत्या रेल्वेवर फुगे फेकल्यास होणार कठोर कारवाई – लोहमार्ग पोलिसांचा इशारा
पुणे: होळी आणि धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर लोहमार्ग पोलिसांनी सतर्कता वाढवली असून, धावत्या रेल्वे गाड्यांवर रंग भरलेले फुगे फेकल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. पुणे, शिवाजीनगर, लोणावळा, चिंचवड आणि दौंड स्थानक परिसरात पोलिसांनी गस्त वाढवली आहे.
होळीच्या सणात नागरिक मोठ्या उत्साहाने रंगांची उधळण करतात. मात्र, काही उत्साही तरुण रेल्वेगाड्यांवर रंगांनी भरलेले फुगे फेकण्याचा धोकादायक प्रकार करतात. यामुळे प्रवाशांना त्रास होऊ शकतो, तसेच अपघात होण्याची शक्यता निर्माण होते. गेल्या वर्षी चिंचवड, खडकी, दौंड आणि लोणावळा परिसरात अशा घटनांची नोंद झाली होती. काहींनी रंगाच्या फुग्यांमध्ये दूषित पाणी भरल्याचेही आढळले होते.
या पार्श्वभूमीवर सुरक्षा उपाययोजना म्हणून प्रमुख रेल्वे स्थानकांवर अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. फुगे फेकण्याच्या प्रकारांवर नजर ठेवण्यासाठी पोलिसांकडून विशेष पथके तयार करण्यात आली असून, नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे लोहमार्ग पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी सांगितले.
रेल्वे प्रवाशांनी अशा घटनांची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.