लोक समाचार –राज राठोड
पुणे शहरातील कोंढवा परिसरात असलेल्या एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये राहणाऱ्या २२ वर्षीय तरुणीवर बुधवारी रात्री साडेसातच्या सुमारास अत्यंत धक्कादायक प्रकार घडला आहे. आरोपीने कुरिअर बॉय असल्याचे भासवत सोसायटीत प्रवेश केला व गुंगीचे स्प्रे मारून त्या तरुणीवर बलात्कार केल्याची माहिती समोर आली आहे.
घटनेनंतर आरोपीने पीडितेच्या मोबाईलमधून स्वतःचा सेल्फी काढला आणि (मी पुन्हा येईन) असा मेसेज टाईप करून ठेवला. हा प्रकार टिळेकर नगर भागात घडला असून, यामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, आरोपीने कुरिअर असल्याचे सांगून बेल वाजवली. तरुणीने कुरिअर माझे नाही असे सांगूनही, सही लागेल,असे सांगून त्याने पीडितेला दरवाजा उघडायला भाग पाडले. दरवाजा उघडताच आरोपीने तिच्या तोंडावर गुंगीचे स्प्रे मारले व ती बेशुद्ध झाल्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. घरात ती एकटीच असल्याचा आरोपीने फायदा घेतला.
या घटनेने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन चौकशी सुरू केली आहे. सीसीटीव्ही फुटेज, मोबाइल डेटा, व परिसरातील सुरक्षा यंत्रणा तपासून आरोपीच्या शोधासाठी १० विशेष पथक तयार करण्यात आलं आहे.
या घटनेवर प्रतिक्रिया देताना काँग्रेसच्या महिला नेत्या संगीता तिवारी यांनी तीव्र संताप व्यक्त केला. महिला रस्त्यावरच नव्हे, आता घरातसुद्धा सुरक्षित राहिलेल्या नाहीत, ही अतिशय गंभीर बाब आहे. अशा घटनांवर कठोर कायदेशीर कारवाई होणं गरजेचं आहे, असे त्या म्हणाल्या.
दरम्यान, कोंढवा पोलीस स्टेशन येथे या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध , बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे,
पोलिसांकडून आरोपीचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे.