४ महिन्यात निवडणूक पूर्ण करा: सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून स्वागत
लोक समाचार – राज राठोड.
पुणे : महाराष्ट्रातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी पुढील चार आठवड्यात अधिसूचना जाहीर करून पुढील चार महिन्यात निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यासंदर्भात माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने स्वागत करण्यात आले.
महाराष्ट्रातील प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मार्गी लावण्यासाठी महाराष्ट्रातील ३४ नागरिकांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनीही याचिका दाखल करत न्यायालयात प्रदीर्घ लढा दिला. या संदर्भात माननीय सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला तथा राज्य सरकारला सूचना देत पुढील चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिलेत. याबद्दल आनंद व्यक्त करत प्रशांत जगताप यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले.
प्रशासन राज राबवत जन्मताला डावलण्याचा महायुतीचा प्रयत्न माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने उधळून लावला. पुणे शहरातील नागरिकांसह महाराष्ट्रातील तमाम नागरिकांसाठी हा अत्यंत दिलासादायक निर्णय आहे. प्रशांत जगताप (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, पुणे)