लोक समाचार – राज राठोड
पुणे शहर गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक-२ कडून २ जुलै रोजी, कोंढवा परिसरातून एका मेफेड्रोन (एम.डी.) तस्कराला अटक करून त्याच्याकडून १३ लाख ६० हजार रुपये किमतीचा ६७ ग्रॅम मेफेड्रोन जप्त केला आहे. पुणे पोलिसांच्या या कारवाईमुळे अंमली पदार्थ विरोधी मोहिमेला मोठे यश मिळाले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मा. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार अंमली पदार्थ विरोधी मोहीम राबवत असताना,
अंमली पदार्थ विरोधी पथक-२ चे पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक हे त्यांच्या स्टाफसह कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी, पोलीस अंमलदार चेतन गायकवाड यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, अहिल्यादेवी होळकर भाजी मंडई समोर, कोंढवा येथे सापळा रचण्यात आला.
या सापळ्यात सुनील विष्णूराम चौधरी (वय २०, रा-खडी मशिन चौक, रिलायन्स मार्ट मागे, जनसेवा बँके समोर, कोंढवा, पुणे) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या झडतीमध्ये एकुण १३ लाख ६० हजार रुपये किमतीचा ६७ ग्रॅम मेफेड्रोन (एम.डी.) हा अंमली पदार्थ आणि इतर ऐवज जप्त करण्यात आला.
सुनील चौधरी विरोधात कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे पोलिसांची ही कारवाई अंमली पदार्थ तस्करांसाठी एक मोठा इशारा मानली जात आहे. या कारवाईमुळे पुणे शहरातील अंमली पदार्थांच्या विक्रीवर अंकुश लागण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सदरची कारवाई ही मा अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे शहर,पंकज देशमुख, मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, पुणे शहर, निखिल पिंगळे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे. २. राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक २. गुन्हे शाखा, पुणे शहर कढील पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहा पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, पोलीस अंमलदार चेतन गायकवाड, संदिप जाधव, आझाद पाटील, साहिल शेख, अझिम शेख, प्रफुल्ल मोरे, शेखर खराडे, यांनी केली आहे.