LOK SAMACHAR – RAJ RATHOD
पुणे येथे आयोजित संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात गर्दीचा फायदा घेत चोऱ्या करणारी टोळी पोलिसांनी अटक केली आहे. गुन्हे शाखेच्या युनिट ५ व ६ च्या पथकाने सहा आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून सुमारे २४ लाख रुपयांचे दागिने आणि मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.
दरवर्षी पालखी सोहळ्यासाठी लाखो भाविक पुणे शहरात दाखल होतात, आणि गर्दीतून चोरटे संधी साधतात. यंदाही महिलांचे सोन्याचे मंगळसूत्रे व भाविकांचे मोबाईल हिसकावणारी टोळी कार्यरत होती. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोठी कारवाई झाली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये चांदणी कांबळे, रिटा कांबळे, बबीता उपाध्ये, पूजा कांबळे (सर्व लातूर), गणेश जाधव (सोलापूर) आणि अरबाज शेख (झारखंड) यांचा समावेश आहे. त्याचबरोबर एका १७ वर्षीय अल्पवयीन आरोपीस ताब्यात घेतले आहे.
जप्त केलेला मुद्देमाल
पोलिसांनी एकूण २२.५ तोळे सोने व १४ मोबाईल हस्तगत केले असून त्याची एकूण किंमत २३,९१,१३० रुपये आहे. आरोपींविरोधात हडपसर, लोणी काळभोर आणि वानवडी पोलीस ठाण्यात दाखल असलेले सहा गुन्हेही उघडकीस आले आहेत.
पोलिसांचे आवाहन
पालखी सोहळ्यात दागिने किंवा मोबाईल चोरीला गेलेल्यांनी त्वरित हडपसर किंवा वानवडी पोलीस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. उर्वरित मुद्देमालाच्या मालकांचा शोध सुरू असून तपास चालू आहे.