होळीसाठी झाड तोडल्यास भरावा लागणार एक लाख दंड – पुणे महापालिकेचा इशारा
पुणे: होळीच्या सणानिमित्त मोठ्या प्रमाणावर लाकडाचा वापर होतो. काही ठिकाणी होळीसाठी नदीकाठच्या किंवा सार्वजनिक ठिकाणांवरील झाडे अनधिकृतपणे तोडली जातात. यावर कारवाई करत पुणे महानगरपालिकेने इशारा दिला आहे की, विनापरवानगी झाडे तोडल्यास संबंधित व्यक्तीला ₹1 लाखाचा दंड भरावा लागेल.
महाराष्ट्र झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम 2021 नुसार, परवानगीशिवाय झाडे तोडणे किंवा जाळणे हा कायद्याने दंडनीय गुन्हा आहे. तरीही काही ठिकाणी झाडांची तोड करून ती विक्रीसाठी ठेवली जात असल्याचे आढळून आले आहे. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने कडक कारवाईचा इशारा दिला आहे.
महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, होळी पर्यावरणपूरक पद्धतीने साजरी करावी आणि झाडांची तोड टाळावी. झाडे तोडताना कोणी आढळल्यास त्यांच्यावर कठोर दंडात्मक कारवाई केली जाईल.