शिवशंकर पोटे हॉस्पिटल चौकाजवळ पीएमपीएमएल बस आणि खाजगी पाण्याचे टँकर सिग्नल तोडून वाहतुकीचे नियम मोडत असल्याचे उघड
LOK SAMACHAR : RAJ RATHOD
पुणे : सातारारोडवरील सहकारनगरमधील पेटे हॉस्पिटल चौक परिसरात पीएमपीएमएल बस आणि खाजगी पाण्याचे टँकर सातत्याने वाहतूक नियम मोडताना दिसत आहेत. या ठिकाणी सिग्नल तोडणे, भरधाव वेगाने वाहन चालवणे यामुळे अपघाताचा धोका वाढत असून, सामान्य नागरिकांचे जीवन धोक्यात आले आहे.

समोर आलेल्या दृश्यांमध्ये स्पष्टपणे दिसते की, हे अवजड वाहन चालक सिग्नल न पाळता वाहतुकीचे सर्व नियम पायदळी तुडवत आहेत. विशेषतः पीएमपीएमएल सारख्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील बसेसकडून होणाऱ्या अशा वर्तणुकीने नागरीकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
स्थानिक नागरिक आणि प्रवाशांनी या बेकायदेशीर प्रकारांविरोधात तक्रारी केल्या असूनही कारवाईचा अभाव दिसून येत आहे. “दररोज या चौकात सिग्नल तोडले जातात. शाळकरी मुले आणि वृद्धांना रस्ता ओलांडणे धोकादायक झाले आहे,” असे एका स्थानिक दुकानदाराने सांगितले.

यावर पोलिसांनी दखल घेतली असून कारवाईचे आश्वासन दिले आहे. “या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. दोषींवर कारवाई केली जाईल. परिसरात वाहतूक नियंत्रण अधिक कडक करण्यात येईल,” असे एका वरिष्ठ वाहतूक पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.
मात्र, वारंवार घडणाऱ्या या घटना पाहता प्रत्यक्षात किती कारवाई होते आणि तिचा परिणाम काय होतो, यावरच नागरीकांचे भवितव्य अवलंबून आहे. तोवर, रस्त्यावर वावरणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांचे प्राण धोक्यातच राहणार आहेत.