लोक समाचार –राज राठोड
पुणे – धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील पीआयसीटी मेन गेट ते भारती विद्यापीठ बॅक गेट या मुख्य रस्त्यावर अतिक्रमणाच्या वाढत्या तक्रारींना अखेर उत्तर देत पुणे महापालिकेने मोठी कारवाई केली. १० जुलै २०२५ रोजी झालेल्या संयुक्त मोहिमेत २२०० चौरस फूट क्षेत्रातील अनधिकृत कच्चे-पक्के बांधकाम हटवण्यात आले.
या मोहिमेत बांधकाम विकास विभाग (झोन क्र. ५) आणि अतिक्रमण विभागाने संयुक्तरित्या सहभाग घेतला. परिसरातील नागरिकांकडून वारंवार तक्रारी प्राप्त होत होत्या, तसेच वाहतूक कोंडीचा मोठा त्रास होत असल्याने ही कारवाई तातडीने हाती घेण्यात आली.
कारवाईच्या वेळी अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाचे उपआयुक्त मा. संदीप खलाटे, परिमंडळ क्र. ३ चे उपआयुक्त मा. विजयकुमार थोरात, तसेच क्षेत्रीय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती. सुरेखा भनगे हे प्रत्यक्ष उपस्थित होते.
या कारवाईत विभागीय अधिकारी व कर्मचारी यांचा सक्रिय सहभाग होता – अतिक्रमण अधिकारी नारायण साबळे, निरीक्षक भिमाजी शिंदे, सागर विभूते, कनिष्ठ अभियंता वंदना गवारी यांच्यासह इतर कर्मचारी उपस्थित होते.
कारवाईदरम्यान खालील साहित्य जप्त करण्यात आले:
हातगाड्या – ३
लोखंडी काउंटर – २२
स्टील काउंटर – ६
टेबल, खुर्च्या, टेंट, शेड व झोपड्या – एकूण १६
एकूण जप्त साहित्य – १० ट्रकमध्ये भरले गेले
सदर कारवाईत ४ पोलीस, २१ महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान, तसेच ४५ मनपा बिगारी कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
महापालिकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे की, अशा प्रकारच्या अतिक्रमणविरोधी मोहिमा येत्या काळातही अधिक व्यापक स्वरूपात राबविल्या जाणार आहेत, जेणेकरून शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत राहील आणि सार्वजनिक जागा मोकळ्या होतील.
पुणेकर नागरिकांनी अशा अनधिकृत अतिक्रमणांविरुद्ध तक्रारी नोंदवाव्यात आणि सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.