लोक समाचार – राज राठोड
पुणे शहरातील बंडगार्डन रेल्वे स्टेशनबाहेर ११ जून २०२५ रोजी झालेल्या ६९ लाख रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांच्या जबरी चोरीप्रकरणी पुणे पोलिसांनी राजस्थानमधील एका कुख्यात गुन्हेगाराला अटक केली आहे. आरोपीकडून १८ लाख ६६ हजार रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
११ जून २०२५ रोजी मुंबईहून पुण्यात आलेल्या एका नामांकित सोने पेढीच्या शोरूमचे ६९ लाख रुपये किमतीचे ७४० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने बंडगार्डन रेल्वे स्टेशनच्या बाहेरील आवारातून जबरीने चोरी करण्यात आले होते. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता
गुन्हेगाराचा शोध आणि अटक
या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा युनिट २ कडील पोलीस अधिकारी आणि अंमलदार करत होते. तपासादरम्यान, हा गुन्हा राजस्थानमधील रेकॉर्डवरील आरोपी रूपसिंग गुलाब सिंग रावत (वय ३१, रा. देलरा, थाना दिवेर, तहसील अमीठ, जिल्हा राजसमद, राजस्थान) आणि त्याच्या साथीदारांनी केल्याचे निष्पन्न झाले.
या माहितीनंतर गुन्हे शाखा युनिट २, चे पथक, ज्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कवठेकर, सपोनि अमोल रसाळ, पोलीस अंमलदार शंकर नेवसे, उज्वल मोकाशी आणि संजय जाधव यांचा समावेश होता, त्यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली राजस्थानमधील अमीठ येथे आरोपीचा शोध सुरू केला.
रूपसिंग रावत हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून परराज्यात असल्याने तो पोलिसांच्या सापळ्यातून वारंवार निसटत होता. मात्र, पोलिसांच्या पथकाने त्याच्यावर पाळत ठेवली. गुप्त बातमीदार आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने २६ जून २०२५ रोजी आरोपी रूपसिंग गुलाब सिंग रावत याला दिवेर, राजस्थान येथून अटक करण्यात यश आले.
अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून गुन्ह्यातील चोरीच्या मालापैकी १८,६६,०००/- रुपये किमतीचे २४९.५० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
सदरची कामगिरी, अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) पंकज देशमुख, मा. पोलिस उप आयुक्त (गुन्हे), निखिल पिंगळे, मा. पोलीस उप आयुक्त, आर्थिक व सायबर अति. कार्यभार (गुन्हे) विवेक मासाळ, सहाय्यक पोलिस आयुक्त गुन्हे १ गणेश इंगळे यांचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक अंजुम बागवान, वरीष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, सपोनि आशिष कवठेकर, सपोनि अमोल रसाळ, पोलिस अंमलदार संजय जाधव, शंकर नेवसे, उज्वल मोकाशी, शंकर कुंभार, गणेश थोरात, साधना ताम्हाणे, निखिल जाधव, ओमकार कुंभार, अमोल सरडे, विनोद चव्हाण, नागेश राख, पुष्पेन्द्र चव्हाण, संतोष टकले, विजय पवार, संजय आबनावे यांनी केली आहे.