लोक समाचार – राज राठोड
जुन्नर तालुक्यातील मुथाळणे येथील रहिवासी झुंबराबाई भाऊ बारे (वय अंदाजे ४७) बेपत्ता झाल्यानंतर सहा दिवसांनी चिल्हेवाडी धरणाच्या जलाशयात या महिलेचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सोमवार, ३० जूनपासून बेपत्ता असलेल्या झुंबराबाई यांचा शोध घेण्यासाठी स्थानिक नागरिक आणि जुन्नर रेस्क्यू टीमचे सदस्य अथक प्रयत्न करत होते.
झुंबराबाई बारे या मुथाळणे येथून येसलठा येथील मांडवी नदीपात्रात बेपत्ता झाल्या होत्या. त्या दिवसापासूनच त्यांच्या कुटुंबीयांनी आणि स्थानिकांनी त्यांचा शोध सुरू केला होता.
मांडवी नदीपात्रातील शोधकार्य हे अत्यंत आव्हानात्मक होते. भौगोलिक परिस्थितीची गुंतागुंत, जोरदार पाऊस आणि नदीतील पाण्याचा वेगवान प्रवाह यामुळे शोधकार्यात अनेक अडथळे निर्माण होत होते. त्यामुळे झुंबराबाई यांचा नेमका ठावठिकाणा लागत नव्हता, ज्यामुळे कुटुंबीयांची चिंता वाढत होती
सहा दिवसांच्या अथक शोधमोहिमेनंतर अखेर शनिवारी दुपारच्या सुमारास चिल्हेवाडी धरणाच्या जलाशयात झुंबराबाई यांचा मृतदेह तरंगताना आढळून आला. शिवजन्मभूमी जुन्नर रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी, चिल्हेवाडी धरणातून बोटीच्या मदतीने मृतदेह पाण्याच्या बाहेर काढले,
या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.
सध्या तरी या घटनेमागील नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. पुढील तपास ओतूर पोलीस करत आहेत.
(या शोधमोहिमेत शिवजन्मभूमी जुन्नर रेस्क्यू टीम. राजकुमार चव्हाण, धनंजय मिरगुंडे, महेंद्र नवले, मुदस्सर इनामदार, ओम बिडवई, आदित्य आचार्य, संदीप पारधी, सिद्धार्थ जाधव, रूपेश जगताप, सुदर्शन कांबळे, विजय वायाळ .)