लोक समाचार –राज राठोड
पुणे – गंभीर गुन्ह्यांमध्ये सामील आणि महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा (मोक्का) अंतर्गत दोन वर्षांपासून फरार असलेल्या एका आरोपीला आंबेगाव पोलिसांनी अचूक माहितीच्या आधारे जेरबंद केले. या कारवाईमुळे पोलिसांची तपास कौशल्य आणि तत्परता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
दि. १ जुलै २०२५ रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास आंबेगाव पोलीस स्टेशनचे कर्मचारी नियमित पेट्रोलिंग करत असताना, पोलिस अंमलदार चेतन गोरे यांना खात्रीशीर बातमी मिळाली की, सुनिल संजय गायकवाड (वय २१, रा. सच्चाईमाता नगर, दुगड शाळेजवळ, आंबेगाव खुर्द) हा आपल्या मित्राला भेटण्यासाठी आपल्या राहत्या परिसरात आला आहे.
या माहितीची शहानिशा करून पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीस त्याच्या परिसरातून अटक केली. पुढील चौकशीत त्याने स्वतःचे नाव सांगून गुन्हा केल्याची कबुली दिली. सुनिल गायकवाड भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या गुन्हा क्रमांक ७९८/२०२३ अंतर्गत आरोपी आहे. त्याच्यावर भारतीय दंड संहिता कलम ३९५, ३२६, १४३, १४७, १४९, ५०४, ५०६(२) तसेच क्रिमिनल लॉ अमेंडमेंट कायदा कलम ७ व मोक्का कायद्यानुसार कलम ३(१)(११), ३(२), ३(४) अंतर्गत गंभीर आरोप आहेत.
पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग करत आहेत.
ही यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपआयुक्त मिलींद मोहिते, सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) गजानन चोरमले, पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर आणि त्यांच्यासोबतचे कर्तव्यदक्ष पोलीस अंमलदार शैलेंद्र साठे, चेतन गोरे, हणमंत मासाळ, निलेश जमदाडे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, प्रमोद भोसले, नितीन कातुर्डे, योगेश जगदाळे, सुभाष मोरे, हरिश गायकवाड, अजय कामठे आणि ज्ञानेश्वर चित्ते.
ही कामगिरी आंबेगाव पोलीस ठाण्याच्या तपास कार्यक्षमता आणि संघटन क्षमतेचे स्पष्ट उदाहरण आहे.