जांभुळवाडी खून प्रकरणी आरोपी २४ तासांच्या आत इंदौर मध्यप्रदेश येथून गजाआड; आंबेगाव पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी
लोक समाचार – राज राठोड
पुणे, १५ जून २०२५: जांभुळवाडी परिसरातील एका तरुणाच्या निघृण खुनाप्रकरणी फरार झालेल्या आरोपीला आंबेगाव पोलिसांनी अवघ्या २४ तासांच्या आत इंदौर मध्यप्रदेश येथून अटक केली आहे. आंबेगाव पोलिसांच्या तपास पथकाने केलेल्या या कौशल्यपूर्ण कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दिनांक १४ जून २०२५ रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास जांभुळवाडी तलावाच्या बांधावर, आंबेगाव खुर्द, पुणे येथे एका तरुणाचा खून झाल्याची माहिती दिनांक १५ जून २०२५ रोजी सकाळी १० वाजता आंबेगाव पोलीस स्टेशनमधील तपास पथकाचे अंमलदार हणमंत मासाळ आणि चेतन गोरे यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारांमार्फत मिळाली. या माहितीची खातरजमा करण्यासाठी आंबेगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) गजानन चोरमले, तपास पथकाचे प्रभारी मोहन कळमकर आणि तपास पथकातील अंमलदार यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तिथे एका तरुणाचा खून झाल्याचे त्यांना आढळून आले.
या घटनेबाबत दीपक सुरेश बंडगर (वय २१, प्रतिक हाईट्स, पारे कंपनी रोड, नन्हे, पुणे) यांनी तक्रार दाखल केली. त्यानुसार आंबेगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर १२४/२०२५, भारतीय न्याय संहिता कलम १०३, २३८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
खून करणाऱ्या आरोपीबाबत अधिक माहिती मिळवताना, आरोपी सूरज गणेश सूर्यवंशी (वय २२) हा इंदूर, मध्य प्रदेश येथे पळून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच, तपास पथकाचे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर आणि पोलीस अंमलदार चेतन गोरे, हणमंत मासाळ, धनाजी धोत्रे, सचिन गाडे यांचे पथक तात्काळ इंदूरकडे रवाना झाले.
मिळालेल्या माहितीच्या आधारे आणि तांत्रिक विश्लेषण करून, पोलिसांनी इंदूरमध्ये आरोपीचा शोध घेतला. आरोपी इंदूरमध्ये मिळून आल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले. कसून चौकशी केली असता, त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली.
आंबेगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने
यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीची माहिती काढून त्याला इंदौर मध्यप्रदेश येथून २४ तासाच्या आत अटक करण्यात आली आहे.
आंबेगाव पोलिसांनी अत्यंत कमी वेळात आणि कौशल्यपूर्ण तपास करून आरोपीला गजाआड केले आहे.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त,अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त,रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग,राजेश बनसोडे, पोलीस उपआयुक्त परिमंडळ-२ श्रीमती स्मार्तना पाटील, सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग पुणे राहुल आवारे यांचे मार्गदर्शनाखाली आंबेगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने, पोनि गुन्हे गजानन चोरमले, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रियंका गोरे, पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर, मारुती वाघमारे, पोलीस अंमलदार शैलेंद्र साठे, चेतन गोरे, हणमंत मासाळ, विनायक पाडळे, निलेश जमदाडे, सचिन तनपुरे, प्रमोद कांबळे धनाजी धोत्रे, सचिन गाडे, प्रमोद भोसले, नितीन कातुर्डे, योगेश जगदाळे, सुभाष मोरे, हरिश गायकवाड, अजय कामठे, यांच्या पथकाने केली.