पाकिस्तानला भारताकडून ठोस प्रत्युत्तर मिळेल – दीपक मानकर
पुणे : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याबद्दल पाकिस्तानला भारताकडून ठोस आणि कठोर उत्तर मिळेल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी व्यक्त केला आहे.
या हल्ल्यात वीरमरण आलेल्या पुण्याच्या संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गनबोटे यांच्या कुटुंबीयांची त्यांनी भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. कुटुंबीयांना कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास आपण तत्पर असल्याचेही मानकर यांनी सांगितले.
पाकिस्तान सतत भारतात दहशतवादी कारवाया घडवत आहे, मात्र भारत त्याला योग्य भाषेत उत्तर देईल, असे ते म्हणाले. पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सक्षम आहेत आणि संपूर्ण देश त्यांच्या सोबत आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
“दहशतवादाला जात आणि धर्म नसतो. पहलगामच्या हल्ल्यात दहशतवाद्यांनी पर्यटकांची नावे विचारून गोळीबार केला, हे अत्यंत निंदनीय आहे. या कृत्याला जबाबदार असलेल्या एकाही दहशतवाद्याला भारतीय सैन्य सोडणार नाही,” असेही मानकर म्हणाले. त्यांनी भारताच्या शौर्य परंपरेचा दाखला देताना छत्रपती शिवाजी महाराज व महाराणा प्रताप यांच्या शौर्याची आठवण करून दिली.
या हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना सुखरूप परत आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी विशेष प्रयत्न केल्याचेही त्यांनी नमूद केले.
पुढे बोलताना मानकर म्हणाले की, पाकिस्तानने सातत्याने दहशतवाद पोसल्यामुळे भारताने सिंधू जल करार स्थगित केला आहे. त्यामुळे पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय दबाव वाढवण्याचे पाऊल भारताने उचलले आहे.