पुणे रेल्वे स्थानकावर लवकरच १६० नवीन सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित होणार
LOK SAMACHAR – RAJ RATHOD
पुणे रेल्वे स्थानकावरील सुरक्षेच्या उपाययोजनांना अधिक बळकटी देण्यासाठी आणि चोरीच्या घटना रोखण्यासाठी लवकरच १६० नवीन सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्यात येणार आहेत. सध्या या कॅमेर्यांचे स्थापनेचे काम सुरु असून येत्या दोन महिन्यांत ते पूर्ण होणार आहे.
या नव्या योजनेनुसार सध्या कार्यरत असलेले ७५ जुने कॅमेरे हटविण्यात येणार आहेत. पुणे विभागाचे विभागीय व्यापारी व्यवस्थापक हेमंत बेहरा यांनी सांगितले की, सध्या पुणे रेल्वे स्थानकावर अंतर्गत आणि बाह्य भाग मिळून केवळ ७५ कॅमेरे कार्यरत आहेत. हे कॅमेरे प्रत्येक कोपरा आणि प्लॅटफॉर्मवर लक्ष ठेवण्यासाठी अपुरे होते. आता नवीन कॅमेर्यांची संख्या यापेक्षा दुप्पट झाली असून हे कॅमेरे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहेत आणि दूर अंतरापर्यंत नजर ठेवू शकतात.
सध्या केबलिंगचे काम प्रगतीपथावर असून ते पुढील महिन्यापर्यंत पूर्ण होणार आहे. त्यानंतर जुने कॅमेरे पूर्णतः काढून टाकले जातील.
ही नवीन यंत्रणा रेल्वे स्थानकाच्या परिसरातील सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यास आणि चोरी व अन्य गैरकायदेशीर क्रियाकलापांना आळा घालण्यास मदत करणार आहे.