सदाशिव पेठ, पुणे – धक्कादायक ‘हिट अॅण्ड रन’ प्रकारात १२ जण जखमी, मद्यधुंद वाहनचालकाकडून भीषण अपघात
LOK SAMACHAR – RAJ RATHOD
पुणे : सदाशिव पेठेतील भावे हायस्कूलजवळ शनिवारी संध्याकाळी एका मद्यधुंद वाहनचालकाने नियंत्रण गमावून चालत्या ह्युंदाई ऑरा कारने १२ पादचाऱ्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात ६ एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसह १२ जण जखमी झाले आहेत.
या प्रकरणातील मुख्य आरोपी जयराम शिवाजी मुले (वय २७, रा. समर्थ कॉलनी, बिबवेवाडी) असून, त्याच्यासोबत कारमध्ये राहुल गोसावी नावाचा सहप्रवासी होता.
अपघातात जखमी झालेल्यांची नावे पुढीलप्रमाणे:
- किशोर हरिभाऊ भपकर (५७)
- पायल अवेशकुमार दुर्गे (२६)
- गुलनाझ सिराज अहमद (२३)
- सोनाली सुधाकर घोळवे (३०)
- मंगेश आत्माराम सुरुसे (३३)
- अमित अशोक गांधी (४५)
- समीर श्रीपाद भालकीकर (४५)
- सोमनाथ केशव मेरुकर (२८)
- प्रशांत ब्रह्मदेव बांदगर (३०)
- अविनाश फाळके
- प्रतीमेश पाटणगे
- संदीप खोपडे
वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजया माळा पवार (विश्रामबाग पोलीस ठाणे) यांनी सांगितले की, सायंकाळी सुमारे ५.४५ वाजता ही घटना घडली. ह्युंदाई ऑरा कारने अचानक नियंत्रण सुटल्यामुळे चहाच्या टपरीजवळ उभ्या असलेल्या नागरिकांवर धडक दिली.
या अपघातात ९ पुरुष आणि ३ महिला जखमी झाल्या असून, त्यापैकी ६ एमपीएससीचे विद्यार्थी आहेत.
चार जण गंभीर जखमी झाले असून, त्यामध्ये एक महिला विद्यार्थिनी गंभीर आहे. तिला योगेश हॉस्पिटलमधून दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. इतर जखमींवर सनसिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. काहींना प्राथमिक उपचारानंतर सोडण्यात आले आहे.
पोलीस उपायुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे यांनी सांगितले की, चालक जयराम मोरे, सहप्रवासी राहुल गोसावी आणि गाडीचा मालक दिगंबर यादव शिंदे (सर्व वय २७) यांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांची वैद्यकीय तपासणी ससून रुग्णालयात सुरू आहे.
दुचाकी व पादचाऱ्यांवरील अपघाताचा प्रकार अत्यंत गंभीर असून, दोषींवर मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवण्याचे गुन्हे दाखल करण्यात आले असून कायद्याची कठोर कारवाई केली जाणार आहे. या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
घटनेचा अधिक तपास सुरू आहे.