लोक समाचार – राज राठोड
पुणे, आंबेगाव पोलिसांनी एक मोठी कारवाई करत भारतीय असल्याची बनावट ओळखपत्रे बाळगणाऱ्या दोन बांगलादेशी महिला आणि त्यांना मदत करणाऱ्या एका व्यक्तीला अटक केली आहे.
या कारवाईमुळे आंबेगाव पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आंबेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी लीझा मकबूल शेख (रा. आनंद पार्क, आंबेगाव खु. कात्रज, पुणे) ही वारंवार बांगलादेशला जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या माहितीची खात्री करण्याचे आदेश दिल्यानंतर आंबेगाव पोलिसांनी तपास सुरू केला.
सुरुवातीला लीझा शेखने पत्ता बदलल्याचे समोर आले. मात्र, पोलीस अंमलदार सागर नारगे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, लीझा शेख सिध्दीविनायक सोसायटी, फ्लॅट नं ३१०, आंबेगाव बु., कात्रज, पुणे येथे राहत असल्याची माहिती मिळाली.
या माहितीच्या आधारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने आणि पोलीस उपनिरीक्षक युवराज शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तात्काळ छापा टाकला.
छाप्यादरम्यान लीझा मकबूल शेख हिच्यासोबत तिची बहीण रिंकी देवी आणि रिंकीचा पती प्रमोद कुमार चौधरी (रा. फतेहपूर, नालंदा, बिहार) हे देखील आढळून आले. पोलिसांनी विचारपूस केली असता, लीझा आणि रिंकी यांनी भारतीय आधारकार्ड, पॅनकार्ड, पासपोर्ट आणि इतर कागदपत्रे सादर केली.
मात्र, पोलिसांनी घराची झडती घेतली असता, लीझा मकबूल शेखचा बांगलादेशी पासपोर्ट आढळून आला. यावरून ती बांगलादेशी नागरिक असून, तिचे खरे नाव खातून तस्लीमा (वडील: मकबूल, पती: मोफीजुर रेहमान – मयत) असल्याचे निष्पन्न झाले. तसेच, तिची बहीण रिंकी देवी ही देखील खातुन तमीना मकबुल मोरल (रा. चांदपाडा, जैसुर, बांगलादेश) असल्याचे उघड झाले.
या तपासात धक्कादायक बाब समोर आली की, बांगलादेशी नागरिक असलेल्या रिंकी ऊर्फ तमीनाने भारतीय नागरिक प्रमोद कुमार चौधरी याच्याशी विवाह केला होता. प्रमोद चौधरीनेच या दोन्ही बांगलादेशी महिलांना भारतीय असल्याचे बनावट ओळखपत्रे बनवून दिली होती.
या गंभीर गुन्ह्याप्रकरणी पोलिसांनी लीझा मकबूल शेख ऊर्फ खातून तस्लीमा, रिंकी देवी ऊर्फ खातुन तमीना मकबुल मोरल आणि प्रमोद कुमार चौधरी या तिघांना ताब्यात घेऊन अटक केली आहे. त्यांच्याविरुद्ध आंबेगाव पोलीस ठाण्यात गुरनं १३१/२०२५, भा.दं.वि. कलम ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१, ३४ सह भारतीय पारपत्र अधिनियम १९६७ चे कलम १२(१अ)(अ)(ब), १२(२) सह विदेशी व्यक्ती अधिनियम सन १९४६ चे कलम १४ अ(अ)(ब), १४ ब, १४ क प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आंबेगाव पोलिसांनी केलेल्या या कामगिरीमुळे बनावट ओळखपत्रे वापरून देशात घुसखोरी करणाऱ्या आणि राहणाऱ्यांवर वचक निर्माण झाला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास आंबेगाव पोलीस करत आहेत.
सदरची कारवाई मा. अमितेश कुमार, पोलीस आयुक्त पुणे शहर, मा. रंजनकुमार शर्मा, सह पोलीस आयुक्त पुणे, मा. राजेश बनसोडे, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग पुणे, श्रीमती स्मार्तना पाटील, पोलीस उप-आयुक्त परिमंडळ २ पुणे, श्री. राहुल आवारे, सहाय्यक पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग पुणे यांचे मार्गदर्शनाखाली आंबेगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शरद झिने, पोलीस निरीक्षक गुन्हे श्री गजानन चोरमले, पोलीस उप-निरीक्षक युवराज शिंदे, पोलीस अंमलदार निलेश जमदाडे, सागर नारगे, प्रमोद भोसले, स्वप्निल शर्मा, महिला पोलीस अंमलदार पूजा खवले यांच्या पथकाने केली आहे.