लोक समाचार – राज राठोड
पुणे : बाणेर–बालेवाडी परिसरातील वर्षानुवर्षे भेडसावणाऱ्या वाहतूक कोंडी, अपूर्ण रस्ते आणि सार्वजनिक सोयी-सुविधांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आज एक उच्चस्तरीय बैठक पार पडली. कोथरूड मतदारसंघाचे आमदार तथा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा. चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत पुणे महापालिका, वाहतूक पोलिस, पोलिस आयुक्त कार्यालय, NHAI, PMRDA यांसारख्या प्रमुख विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. नागरिकांनी मांडलेल्या समस्यांची गांभीर्याने दखल घेत, मंत्री महोदयांनी सण-उत्सवाच्या आधी सर्व महत्त्वाचे प्रश्न मार्गी लावण्याचे आणि तातडीने उपाययोजना करण्याचे स्पष्ट आदेश दिले.
बैठकीत नागरिकांनी जुपिटर चौक, गणपती मंदिर चौक, दसरा चौक, ममता चौक, सीएम इंटरनॅशनल, साई चौक, राधा चौक येथील वाहतूक नियोजन, सिग्नल यंत्रणा आणि वॉर्डन्सची संख्या वाढवण्यावर भर दिला. याव्यतिरिक्त, अतिक्रमणे हटवणे, अपूर्ण रस्त्यांची कामे पूर्ण करणे, पाणी साचणाऱ्या ठिकाणी ड्रेनेज दुरुस्ती, सबस्टेशनची उभारणी आणि दारू दुकानांमुळे होणारा त्रास यांसारख्या मूलभूत प्रश्नांवरही चर्चा झाली.
नानावरे ब्रिजजवळील साचलेले पाणी, पदपथ अतिक्रमण, बसस्टॉपची आवश्यकता, रस्ते व फूटपाथ दुरुस्ती, झाडांची छाटणी, मेट्रो पुलाखालच्या ठिकाणी साचलेले पाणी आणि रस्ते अधिग्रहणाशी संबंधित अनेक समस्या नागरिकांनी सविस्तरपणे मांडल्या. यावर प्रशासनाने त्वरित कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
विशेषतः, गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला सदानंद रेसिडेन्सी हॉटेलजवळील सर्व्हिस रोड अंडरपासचा मुद्दा बैठकीत अग्रक्रमाने मांडण्यात आला. याबाबत त्वरित उपाययोजना करून काम सुरू करण्याच्या सूचना NHAI अधिकाऱ्यांना देण्यात आल्या असून, हे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे आदेश चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले.
या महत्त्वपूर्ण बैठकीला बालेवाडीतील सर्व फेडरेशनचे प्रतिनिधी, तसेच पाषाण, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी, सुस, महाळुंगे येथील विविध सोसायट्यांचे पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीमुळे बाणेर-बालेवाडी परिसरातील नागरिकांना लवकरच वाहतूक कोंडी आणि इतर समस्यांपासून दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
यावेळी कोथरूड उत्तर मंडळ अध्यक्ष लहू बालवडकर, गणेश कळमकर, पुनीत जोशी, प्रकाश तात्या बालवडकर, प्रल्हाद सायकर, अमोल बालवडकर, राहुल कोकाटे, ज्योतीताई कळमकर, स्वप्नाली सायकर, सचिन पाषाणकर, मोरेश्वर बालवडकर, सचिन दळवी, शिवम सुतार, शिवम बालवडकर, अस्मिता करंदीकर तसेच कोथरूड उत्तर मंडलाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.