लोक समाचार – राज राठोड
पुणे: कोंढवा येथील २२ वर्षीय आयटी क्षेत्रात कार्यरत तरुणीवर बलात्काराच्या प्रकरणात पुणे पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, पीडित तरुणी आणि आरोपी एकमेकांना पूर्वीपासून ओळखत होते आणि त्यांनी सहमतीने सेल्फी काढले होते. तसेच केमिकल स्प्रेचा वापर झाल्याचे कोणतेही पुरावे आढळलेले नाहीत. पोलिसांच्या प्राथमिक तपासात या गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत.
दोघांची ओळख गेल्या वर्षी एका कौटुंबिक कार्यक्रमात झाली होती. घटनेच्या दिवशी आरोपी संध्याकाळी ७.२७ वाजता सोसायटीत प्रवेश करताना सीसीटीव्हीमध्ये दिसतो आणि रात्री ८.२० च्या सुमारास सोसायटीमधून बाहेर पडतो, असे पोलिसांनी स्पष्ट केले.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, घटनेच्या दिवशी दोघांमध्ये संवाद झाला होता. प्राथमिक चौकशीतून असे समोर आले आहे की सेल्फी सहमतीने काढण्यात आली होती. कोणताही केमिकल स्प्रे पीडितेवर वापरलेला नाही. तसेच आरोपी गेल्यानंतर ती फोटो एडिट करण्यात आले होते, असा तांत्रिक तपासातून निष्कर्ष निघाला आहे.
पीडितेच्या मोबाईलमधील मूळ व डिलीट केलेली फूटेजही पोलिसांनी मिळवली असून त्याचा तपास सुरू आहे. फोनवर पहिला कॉल कोणी केला, याचाही शोध घेतला जात आहे. संबंधित सोसायटीतील ४४ फ्लॅट्समधील रहिवाशांची चौकशी करण्यात आली आहे. पोलिसांनी तब्बल ५०० सीसीटीव्ही फुटेज तपासले असून त्यानंतर आरोपीला बाणेर येथून ताब्यात घेण्यात आले.
मोठी पोलिस यंत्रणा तैनात:
या तपासासाठी गुन्हे शाखा व अनेक पोलिस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती.
या प्रकरणातील बलात्काराच्या आरोपांचा अधिक तपशीलवार तपास सुरू असून सर्व पैलूंचा बारकाईने अभ्यास केला जात आहे, असे पोलिसांनी स्पष्ट केले.
या प्रकरणात सुरुवातीला करण्यात आलेल्या आरोपांमध्ये आता नवे तथ्य समोर येत असून, पोलीस यंत्रणा अत्यंत बारकाईने आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पुढील कारवाई करत आहे.