जाधववाडी तलाव भरून वाहण्याचा इशारा; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
जाधववाडी लि.पा. तलावात सध्या ९४.५३% पाणी साठा झाल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे. हा तलाव दरवाजाविना (Ungated) असल्यामुळे सततच्या पावसामुळे आणि धरणात वाढलेल्या येवामुळे कोणत्याही क्षणी तलावातून अनियंत्रित पाणी इंद्रायणी नदी पात्रात सोडले जाऊ शकते, असा इशारा देण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर, जांबवडे, सुदुंबरे, सुदवडी, देहू ते तुळापूर या इंद्रायणी नदीकाठी वसलेल्या गावांतील नागरिकांना नदीच्या जवळ न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच नदीपात्रात जनावरे किंवा इतर साहित्य असल्यास ते त्वरित हलवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
दरम्यान, देहू-आळंदी येथे सुरू असलेल्या पायी दिंडी सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकऱ्यांनी देखील नदीपात्रात उतरणे टाळावे, असे प्रशासनाकडून आवर्जून सांगण्यात आले आहे.
स्थानिक ग्रामपंचायत, नगरपरिषद आणि महापालिका यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, जेणेकरून कोणतीही आपत्ती उद्भवू नये.
(ही माहिती पुणे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे)