वृक्षथॉन मॅरेथॉन’द्वारे पर्यावरण आणि आरोग्याचा संदेश: पुणेकरांचा मोठ्या संख्येत सहभाग
लोक समाचार – राज राठोड
पुणे, १ जून २०२५ – जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत पुणे शहरात ‘वृक्षथॉन मॅरेथॉन’ चे भव्य आयोजन करण्यात आले. पुणे शहर पोलिस, वनविभाग आणि वृक्षथॉन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ही मॅरेथॉन पर्यावरण संरक्षण, वृक्षलागवड आणि आरोग्यविषयक जनजागृतीसाठी आयोजित करण्यात आली होती.
ही मॅरेथॉन पोलीस मुख्यालय, शिवाजीनगर येथून उत्साहात सुरू झाली. १० हजार हून अधिक धावपटूंनी या उपक्रमात सहभाग नोंदवला. मॅरेथॉनमध्ये २१ किमी, १० किमी, ५ किमी आणि ३ किमी अशा विविध अंतरांच्या शर्यतींचा समावेश होता. पहाटे ५ वाजता २१ किमी शर्यतीला सुरुवात झाली आणि त्यानंतर इतर अंतरांच्या मॅरेथॉनही टप्प्याटप्प्याने सुरू झाल्या.
मुख्य अतिथी म्हणून पुणे शहराचे पोलिस आयुक्त श्री. अमितेश कुमार, मुख्य वनसंरक्षक श्री. एन.आर. प्रवीण, सह पोलिस आयुक्त श्री. रंजनकुमार शर्मा, तसेच चितळे ग्रुपचे इंद्रनील चितळे व इतर मान्यवर उपस्थित होते. त्यांनी झेंडा दाखवून स्पर्धेचा शुभारंभ केला.
विद्यापीठ चौक, पाषाण, बावधन या मार्गांवरून मॅरेथॉन पार पडली. स्पर्धकांनी पर्यावरण आणि आरोग्याविषयी जनजागृती करत उत्साहाने धाव घेतली. सर्व सहभागी धावपटूंना पदक, प्रमाणपत्र आणि देशी वृक्षांचे रोपटी भेट म्हणून देण्यात आली.
या उपक्रमाचे खास वैशिष्ट्य म्हणजे राज्य शासनातील पोलिस आणि वन विभाग यांचे एकत्रित सहकार्य. विविध खाजगी संस्था, कॉर्पोरेट्स आणि शैक्षणिक संस्था — जसे की चितळे बंधू, पंचशील, बजाज, क्रेडाई, Emcure, अॅक्सिस बँक, भारती विद्यापीठ, संचेती हॉस्पिटल, मॉडर्न आणि फर्ग्युसन कॉलेज इ. — यांनी सक्रिय सहभाग घेतला.
स्पर्धेनंतर पार पडलेल्या बक्षीस समारंभात विजेत्यांना EV कार, EV दुचाकी, EV सायकल आणि रोख पारितोषिके देण्यात आली. हे पारितोषिक श्री. अमितेश कुमार, रंजनकुमार शर्मा, मनोज पाटील, आर.एन. प्रवीण, तुषार चव्हाण आणि इंद्रनील चितळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
येणाऱ्या काळात देखील पुणेकरांसाठी पुणे पोलिसांकडून मॅरेथॉनचे आयोजन करण्यात येईल , असे सांगण्यात आले, या उपक्रमाने ‘आरोग्य आणि पर्यावरण संवर्धन’ या दुतोंडी उद्दिष्टाला गती देत पुणेकरांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण केली.