चुकीने दुसऱ्याच्या खात्यावर गेलेले ७५ हजार रुपये, अवघ्या १० मिनिटांत परत
लोक समाचार – राज राठोड
पुण्यातील एका निवृत्त व्यक्तीने सकाळी सहज मोबाईलवरून बँकेच्या व्यवहारांची चौकशी केली आणि अचानक त्यांना कळाले की, त्यांनी ७५ हजार रुपये चुकीच्या खात्यावर पाठवले आहेत, हा धक्का बसल्यावर त्यांनी त्वरित भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली.
पोलीस निरीक्षक सावळाराम साळगांवकर यांनी तक्रार गांभीर्याने घेतली. पोलीस अमलदार राहुल बांडे आणि दीपक शेंडे यांनी तात्काळ आंध्रप्रदेशमधील खातेदाराशी संपर्क साधला. पण खातेदाराने पैसे परत देण्यास टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी व्हाट्सअप व्हिडिओ कॉलद्वारे त्याला समजावले आणि त्याला खात्री पटवली की, हा प्रकार कायद्याच्या कक्षेत आहे.
विशेष म्हणजे केवळ १० मिनिटांतच संपूर्ण रक्कम तक्रारदाराच्या खात्यात परत जमा झाली,
ही घटना फक्त एका वेगवान पोलिसी कारवाईचे उदाहरण नाही, तर ती संवेदनशीलतेने नागरिकांच्या समस्यांवर त्वरित प्रतिसाद कसा दिला जाऊ शकतो, याचे जिवंत उदाहरण आहे. नागरिकांनी अशा प्रसंगी पोलिसांवर विश्वास ठेवायला हवा, कारण योग्य वेळी त्वरित मदत मिळू शकते.
भारती विद्यापीठ पोलिसांकडून नागरिकांना सावधगिरीने बँकेचे व्यवहार करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मोबाईलद्वारे पैसे हस्तांतरित करताना खात्याची माहिती अचूक तपासूनच व्यवहार पूर्ण करावा, जेणेकरून चुकीच्या खात्यात रक्कम जाण्याचा संभाव्य धोका टाळता येईल. आपल्या आर्थिक सुरक्षेसाठी सावधानता आणि सतर्कता अत्यावश्यक आहे.
सावळाराम साळगांवकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन.