लोक समाचार – राज राठोड
पुणे : पुण्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. येऱवडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका दांपत्याने स्वतःच्या ४० दिवसांच्या चिमुकल्या मुलीला ३लाख ५०हजार रुपयांच्या मोबदल्यात विकल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आई-वडीलांसह एकूण सहा जणांना अटक केली आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे खालीलप्रमाणे आहेत :
मीनल ओंकार सापळ (३०)
ओंकार औदुंबर सापळ (२९) – दोघेही रा. बिबवेवाडी
साहिल अफजल बागवान (२७)
रेश्मा शंकर पानसरे (३४)
सचिन राम आवटाडे (४४) – तिघेही रा. येऱवडा
दीपाली विकास फाटकगरे (३२) – रा. संगमनेर
प्रकरणाचा तपशील:
मीनल सापळ हिला पहिल्या विवाहातून पाच वर्षांचा मुलगा असून सध्या ती ओंकार सापळसोबत सहजीवनात राहत आहे. २५ जून २०२५ रोजी या दांपत्याच्या घरी मुलीचा जन्म झाला. त्यानंतर काही दलालांच्या आमिषाला बळी पडून त्यांनी केवळ ३ लाख ५०हजार रुपयांत चिमुकलीला विक्रीसाठी मान्यता दिली. पोलिस तपासात उघड झाले की, मुलीला दीपाली फाटकगरे हिला देण्यात आले होते आणि त्याकरिता मीनल व ओंकार सापळ यांना २ लाख रुपये देण्यात आले होते.
परंतु नंतर या दांपत्याच्या लक्षात आले की, दलालांनी मोठी रक्कम लपवून ठेवली आहे. यावरून त्यांच्यात वाद निर्माण झाला. त्यांनी थेट पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करत आपली मुलगी पळवली गेल्याचा दावा केला.
पोलिसांची कसून चौकशी :
या तक्रारीवरून येऱवडा पोलिसांनी तपास सुरू केला आणि दलालांसह मुख्य आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आणि मुलगी विक्री झाल्याचे समोर आले. या व्यवहारात कोणतीही कायदेशीर दत्तक प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली नव्हती.
येऱवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेलके यांनी सांगितले की,
दीपाली फाटकगरे हिने कायदेशीर प्रक्रिया न पाळता चिमुकलीचा ताबा घेतला होता. संबंधितांवर बालक विक्री व मानव तस्करीच्या गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आधी अपहरणाचा दावा करणाऱ्या पालकांनी स्वतःच बाळ विकल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
फाटकगरे ही विवाहित असून तिने चिमुकली विकत का घेतली, याचा तपास पोलिस करत आहेत. संपूर्ण रॅकेटचा शोध लावण्यासाठी तपास सुरु असून लवकरच कठोर कारवाई करण्यात येणार आहे.