पहिल्याच दिवशी कामावर हजर झालेल्या तरुणाचा गॅस सिलिंडर स्फोटात मृत्यू
पुणे : धनकवडी येथील केके मार्केटमधील एका चहा दुकानात गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत २४ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. विशेष म्हणजे हा तरुण त्याच्या कामाच्या पहिल्याच दिवशी मृत्युमुखी पडला.
मृत तरुणाचे नाव संतोष (२४) असे आहे.
फायर अधिकारी सुनील निकेनवरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी सुमारे ४.१५ वाजता साईबा टी शॉपमध्ये ही दुर्घटना घडली. अग्निशमन दलाला त्वरित माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले.
दुकानातील कर्मचाऱ्याने दूध गरम करण्यासाठी भांडे गॅसवर ठेवले होते. मात्र, दुकानात जवळच काही गॅस सिलिंडर ठेवण्यात आले होते. त्यातील एका सिलिंडरमधून गॅस गळती होत होती आणि त्यामुळे अचानक आग भडकल्याने संपूर्ण दुकान जळून खाक झाले.
इतर कर्मचाऱ्यांनी कसाबसा जीव वाचवला, मात्र संतोष दुकानाच्या आतच सिलिंडरच्या स्फोटात गंभीर भाजला. अग्निशमन दलाने घटनास्थळी आग आटोक्यात आणली तसेच तीन गॅस सिलिंडर बाहेर काढले. मात्र, तोपर्यंत संतोष गंभीर भाजला होता. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.